मुलगा शाळेत गेला तर भीती… गावात तिरंगा फडकवला तर शिक्षा… आजारपण आलं तर पोलिसांची मदत घेतली तर मृत्यू. हे कोणतं स्वातंत्र्य? हा कसला हक्काचा लढा?’ — हा आक्रोश आहे भारताच्या हृदयात राहणाऱ्या हजारो आदिवासींचा. ज्यांच्या हातात कुदळ हवी, ज्यांच्या खांद्यावर पुस्तकांची बॅग हवी, ज्यांच्या घराघरातून सणासुदीची गाणी घुमायला हवीत, त्यांच्याच आयुष्यावर आज मृत्यूची छाया पसरली आहे. कारण एकच—नक्षलवाद.


रक्ताने माखलेली क्रांती

गेल्या पाच दशकांपासून “जल, जंगल आणि जमीन” या हक्काच्या नाऱ्याखाली सुरू झालेली माओवादी नक्षल चळवळ आज पूर्णपणे विकृत, अमानवी आणि रक्तपिपासू रूप धारण करून उभी आहे. कागदावर आदिवासींच्या हितासाठी लढा दिला जातो असे दाखवले जाते, पण प्रत्यक्षात या चळवळीचा पहिला आणि सर्वात मोठा बळी ठरतो तो निरपराध आदिवासीच.


कांकेरचा नरूटी – तिरंग्याच्या शपथेची किंमत मृत्यू

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील मुनेष नरूटी नुकताच १२वीत उत्तीर्ण झाला होता. गावाच्या विकासाची स्वप्नं त्याने पाहिली होती. १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनी त्याने गावात अभिमानाने तिरंगा फडकावला. दुसऱ्याच दिवशी माओवादी “जन-अदालतीत” त्याचा गळा चिरून हत्या करण्यात आली. आरोप—तो पोलिसांचा खबरी आहे!

कुटुंबाला इतकी भीती वाटली की, मृतदेहही गुपचूप दफन करण्यात आला. तिरंग्याचा सलाम एका क्षणात मातमात बदलला.


घटनांची रक्तरंजित साखळी (२०१५–२०२५)

वर्ष ठिकाण बळी गेलेले नागरिक हत्येचं कारण (नक्षलवाद्यांचा आरोप)

२०१५ कसनासूर (गडचिरोली) ३ तरुण पोलिस खबरी ठरवले
२०१८ भामरागड जयराम गावडे गावात रस्ता बांधकामाला पाठिंबा
२०२० चंद्रपूर शाळकरी मुलगा पोलिसांशी संवाद
२०२३ गडचिरोली साईनाथ नरोटे गाव सभेत सरकारी योजना मान्य केली
२०२५ कांकेर मुनेष नरूटी तिरंगा फडकावला
२०२५ छत्तीसगड ओयम सिताराव व भाऊ स्वयम पोलिसांकडून मदत घेतली / शालेय गणवेशात उपस्थिती

या तक्त्यातून स्पष्ट दिसतं की, संशय, आरोप किंवा अगदी किरकोळ कारणावरूनही जीव घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे.


निर्दयतेची परिसीमा – ओयम बंधूंची हत्या

छत्तीसगडमधील ओयम सिताराव याची गर्भवती पत्नी घरात पडून अत्यवस्थ झाली. दवाखान्यात नेण्यासाठी त्याने पोलिसांची मदत घेतली. एवढंच कारण पुरेसं ठरलं. माओवादींनी सितारावचा खून केला. वहिनीच्या तेरवीला केवळ शालेय गणवेश घालून आल्यामुळे १६ वर्षीय स्वयमलाही उघडपणे ठार करण्यात आलं.

“माझे दोन्ही मुलगे गेले… आता घरात फक्त शांतता आणि मृत्यूचा वास आहे,” असे त्यांच्या आईचे डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंनी भरलेले शब्द गावकऱ्यांनी सांगितले.


आदिवासी विरुद्ध आदिवासी – अंतर्गत युद्ध

९० ते ९५ टक्के नक्षलवादी स्वतः आदिवासी असूनही त्यांच्या बंदुकीच्या गोळ्यांचा पहिला बळी ठरतो तोही स्वतःचा बांधव. विकासाच्या प्रत्येक पावलावर अडथळा आणून, भीती पसरवून आणि शंकेच्या नावाखाली हत्या करून ही चळवळ गावोगाव “भाऊ विरुद्ध भाऊ” असं युद्ध उभं करते.

एक गावकरी सांगतो—
“गावात रस्त्याचं काम सुरू झालं, तर काहींची हत्या होते. एखाद्याने पोलिसांशी बोललं, तर त्याचा मृत्यू ठरलेला. आम्ही रोजच सावलीत जगतो… कुठेही सुरक्षित नाही.”


नेत्यांचा ढोंगीपणा

शहरी भागात नक्षलवादाला पाठिंबा देणारे नेते व कार्यकर्ते आपल्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवतात, मोठ्या नोकऱ्या मिळवतात. त्यांच्यासाठी नक्षलवाद म्हणजे केवळ राजकीय अजेंडा किंवा बौद्धिक चर्चेचा विषय. पण जंगलात राहणाऱ्या गोरगरीब आदिवासींसाठी तो मृत्यूचा रोजचा सामना आहे.


आकडेवारी सांगते सत्य

राज्य / जिल्हा १९८५ पासून मृत्यूमुखी पडलेले नागरिक

गडचिरोली ५५७
गोंदिया १८
चंद्रपूर १२
यवतमाळ ९
नांदेड ११
महाराष्ट्र एकूण ६०७

प्रत्येक आकडा म्हणजे एक विझलेलं आयुष्य, एक उद्ध्वस्त कुटुंब, एक तुटलेलं स्वप्न.


आशेचा किरण – सरकारची ठोस मोहीम

केंद्र सरकारने नक्षल उन्मूलनासाठी अनेक पावले उचलली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी २०२६ पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सुरक्षा दलांची मोहीम, पायाभूत सुविधा विकास, गावोगाव रस्ते, शाळा, आरोग्य सेवा यामुळे नक्षलवाद्यांचा प्रभाव काही भागांत लक्षणीय घटला आहे.


समाजाची जबाबदारी

पण खरी लढाई फक्त बंदुकीने जिंकता येणार नाही. ती समाजाच्या एकमुखी विरोधानेच जिंकता येईल. गावातील मातांनी आपल्या मुलांना बंदुकीऐवजी पुस्तकं द्यायची आहेत. युवकांनी दहशतीचा मार्ग नाकारून प्रगतीचा मार्ग स्वीकारायचा आहे.

“मला पोलिस व्हायचं आहे… पण गावात सांगायलाही भीती वाटते,” असं एका १५ वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याने माध्यमांशी बोलताना सांगितलं. ही भीती मोडून काढणं हेच सर्वात मोठं आव्हान आहे.


लाल सलाम विरुद्ध तिरंगा सलाम

माओवाद्यांच्या “लाल सलाम”ने मिळालं ते केवळ विध्वंस, रक्तपात आणि अश्रू.
तिरंग्याच्या सलामाने मिळते विकासाची संधी, शिक्षणाची ताकद आणि सुरक्षित भविष्य.

आजच्या आदिवासी समाजासमोर दोन वाटा आहेत—

एक रक्ताकडे नेणारी

दुसरी प्रकाशाकडे नेणारी

निवड त्यांनाच करायची आहे.


शेवटची हाक

इतिहास सांगतो की हिंसा कधीही शाश्वत उपाय देत नाही. नक्षलवादाच्या रक्तरंजित अध्यायाने हजारो आदिवासींची स्वप्नं गिळंकृत केली आहेत. आता तरी ही साखळी तोडायलाच हवी.

‘आजचा लाल सलाम नाकारूनच उद्याचा तिरंगा फडकवता येईल’—हे सत्य स्वीकारूनच नवा पहाट येईल.


संजयसिंह ठाकूर, नागपूर
(नक्षलविषयक अभ्यासक)