नागपूर : इंदोरा–दिघोरी उड्डाणपूलाच्या कामामुळे ग्रेट नाग रोडवर दररोजच वाहतूक कोंडी होते. शनिवारी दुपारी ठेकेदार एनसीसी कंपनीने अशोक चौक ते रेशीमबाग चौक या दरम्यानचा रस्ता कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद केला. यामुळे आसपासच्या रस्त्यांवर तासन्तास वाहने अडकून पडली होती. नाग नदीवरील पुलाजवळ तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
यावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस कर्मचारीदेखील हजर नव्हते. परिणामी वाहनचालकांना वाहन चालवितांना चांगलीच कसरत करावी लागत होती. स्थानिक व्यापारी, रहिवासी आणि खरेदीसाठी आलेले नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते. विशेषत: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी वाढली असताना अचानक रस्ता बंद केल्याने व्यावसायिकांचे व्यवहारही बाधित झाले.
एनसीसी कंपनी अशोक चौक येथे एलिव्हेटेड रोटरीचे काम करीत आहे. या कामासाठी रस्ता बंद करण्यापूर्वी वाहतूक पोलीसांची परवानगी घेऊन नागरिकांना सूचना देणे बंधनकारक आहे. मात्र, नियम पायदळी तुडवून थेट दोन्ही बाजूंनी रस्ता बंद करण्यात आला. वाहनचालकांना चौकापर्यंत पोहोचल्यावर परत फिरण्यास भाग पडत होते.
स्थानिक व्यापारी श्रीकांत ढोलके यांचे म्हणने आहे की, ‘दरवेळी अचानक रस्ता बंद करून नागरिकांची मोठी गैरसोय केली जाते. त्यामुळे लोकांमध्ये ठेकेदार कंपनीबद्दल प्रचंड रोष आहे. वाहतूक कोंडी ही मोठी समस्या झाली असून, एनएचएआयने कंपनीवर कठोर कारवाई केली पाहिजे. अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन करू.
यापूर्वी काँग्रेस पक्षानेही या कंपनीविरुद्ध आंदोलन केले होते. तरीदेखील कंपनीचा मनमानी कारभार सुरूच आहे.
रस्ता बंद करुन ठेकेदार कंपनी मनमानी करतेय आणि एनएचएआय गप्प आहे! याचे रहस्य काय? असा जनतेचा सवाल आहे.
