नागपूर : देशासाठी लढणारा सैनिक जेव्हा निसर्गासाठीही शस्त्र उचलतो, तेव्हा ती केवळ लढाई नसते—ती एक जागृती असते! अशीच प्रेरणादायी जागृती घेऊन आले आहेत लेफ्टनंट कर्नल (डॉ.) चेतन व्ही. धवड (सेना पदकप्राप्त, निवृत्त). दिल्लीतील आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स दरम्यान भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्यांच्या ‘भारतीय सेना : एक लढाई पर्यावरणाच्या नावाने’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.
सेनाप्रमुखांनी या पुस्तकाला स्वतः प्रस्तावना लिहीत सांगितले की, ‘ ‘ ‘देशाचे रक्षण आणि पर्यावरणाचे संरक्षण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.’ हे विधानच या पुस्तकाचा आत्मा ठरतो. हवामान बदलासारख्या गुंतागुंतीच्या विषयाला लेखकाने सैनिकांच्या भाषेत, भावनांनी ओथंबलेल्या पण शास्त्रीय जाणिवांनी सजलेल्या शैलीत मांडले आहे. प्रत्येक सैनिकाला ‘क्लायमेट वॉरियर’ बनविण्याचे हे आवाहन आहे.
यापूर्वी त्यांनी इंग्रजी पुस्तक “Indian Defence Forces to Combat Climate Change: Green Defence” द्वारे जगासमोर भारताच्या संरक्षण दलांची पर्यावरणीय जबाबदारी मांडली होती. त्यात त्यांनी हवामान बदलाला ‘थ्रेट मल्टिप्लायर’ म्हणत दाखवून दिले की आपत्तींच्या काळात सेना फक्त लोकांचे नव्हे तर पृथ्वीचेही रक्षण करते.
मणिपूर आणि काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमेत शौर्य दाखवून सेना पदक मिळवणारे ले. कर्नल धवड हे आयआयटी रुडकीचे पीएच.डी. पदवीधर असून त्यांच्या विचारांची मुळे मात्र त्यांच्या मातीत — कातोलमध्ये — घट्ट रोवलेली आहेत. “सेवेचा अर्थ फक्त बंदूक चालविणे नाही, तर झाडे लावणे, जलसंधारण करणे आणि शाश्वत जीवन जगणेही आहे,” हा त्यांचा ठाम विश्वास.
देशरक्षणाच्या शपथेसोबतच पृथ्वीरक्षणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या या ‘ग्रीन सोल्जर’ ची कहाणी आज प्रत्येक भारतीय सैनिकाला नव्या प्रेरणेने भारावून टाकणारी ठरते.
