नागपूर : दंडकारण्याच्या दाट जंगलात वर्षानुवर्षे बंदुकीच्या नळीवर सत्ता गाजवणारा नक्षलवादाचा मोठा चेहरा — मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू — अखेर आपल्या ६१ सहकाऱ्यासह शरण आला . गडचिरोलीच्या भूमीत दशकांपासून पेटलेला लाल संघर्ष आता मंदावू लागल्याचे संकेत या आत्मसमर्पणाने दिले आहेत. राज्याच्या इतिहासातील हा कदाचित सर्वात मोठा ‘टर्निंग पॉइंट’ ठरू शकतो.
क्ष दीर्घकाळ नक्षल चळवळीत सक्रिय राहून पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीपर्यंत पोहोचलेल्या वरिष्ठ नक्षलवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने अखेर आपल्या ६१ सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यावर विविध राज्यांत मिळून दहा कोटीहून अधिक बक्षीस होते.दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तो शस्त्र खाली ठेवणार असल्याचे सूत्रांनुसार कळते. या समारंभाला कदाचित भारताचे गृहमंत्री अमीत शहा सुध्दा उपस्थित राहू शकतात. असे बोलले जात आहे.

भूपती हा नक्षल संघटनेचा प्रभावशाली रणनीतिकार आणि मेंदू मानला जातो. महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील प्लाटूनचा तो अनेक वर्ष मार्गदर्शक म्हणून कार्यरत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून संघटनेच्या शीर्ष नेतृत्वाशी त्याचे मतभेद चिघळले होते. भूपतीने ‘सशस्त्र संघर्ष निष्फळ ठरला’ असे जाहीरपणे मान्य केले आणि “संघर्ष नव्हे, संवाद हाच पर्याय” असा संदेश आपल्या पत्रकातून दिला होता.

त्याच्या या भूमिकेला संघटनेतील काही वरिष्ठांनी विरोध केला. महासचिव थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी यांच्या नेतृत्वाखालील गटाने सशस्त्र लढ्याचा मार्गच योग्य असल्याचे ठाम सांगितले. अखेर केंद्रीय समितीनेच भूपतीवर दबाव आणला आणि शस्त्र खाली ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर भूपतीने संघटनेतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आणि आपल्या ६१ सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असल्याचे बोलले जाते.

भूपतीच्या आत्मसमर्पणबाबत पोलिसांकडून अद्याप दुजोरा मिळू शकला नाही. मात्र भूपती आणि त्याचा संपूर्ण गट सध्या पोलिसांच्या संरक्षणाखाली असून, शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन योजनेअंतर्गत सुरक्षिततेची हमी देण्यात आली असल्याचे समजते.

गेल्या काही महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात आत्मसमर्पणाची मालिका सुरूच आहे. जानेवारीत भूपतीची पत्नी आणि वरिष्ठ नेत्या तारक्का हिनेही आत्मसमर्पण केले होते. त्यामुळे भूपतीचे हे पाऊल नक्षल चळवळीतील सर्वात निर्णायक वळण मानले जात आहे.

नक्षल चळवळीचा शेवट जवळ?

राज्य सरकारच्या आत्मसमर्पण धोरणामुळे नक्षल चळवळीची पकड हळूहळू सैल होत आहे. गेल्या दोन दशकांत गडचिरोली जिल्ह्यात ७०० हून अधिक नक्षल्यांनी शरणागती पत्करली आहे. भूपतीसारख्या केंद्रीय नेत्याच्या आत्मसमर्पणानंतर ‘जनयुद्धा’चा हा शेवटचा अध्याय सुरू झाल्याची चर्चा सुरक्षा वर्तुळात रंगली आहे.
दंडकारण्याच्या जंगलात दशकानुदशके झडणाऱ्या रक्तरंजित संघर्षानंतर अखेर शांततेचा झेंडा फडकवण्याची ही सुरुवात ठरेल, अशीच आशा राज्यातील जनतेत व्यक्त होत आहे.