नागपूर : घरगुती वादाच्या छायेत जगणाऱ्या एका कोवळ्या विद्यार्थिनीने आयुष्याचा धागाच संपवला. शनिवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. प्रांजली दिलीप ननकटे (वय १८, रा. सिर्सी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून, ती नूतन आदर्श महाविद्यालयात बारावीला शिकत होती.

शिक्षणासाठी प्रांजली धनगर मोहल्ल्यातील भाड्याच्या खोलीत राहत होती. तिच्यासोबत दोन लहान भाऊ – एक दहावीत तर दुसरा आठवीत – देखील शिक्षण घेत होते. काही दिवसांपूर्वी ती मूळ गावी सिर्सीला गेली होती. परत आल्यापासून ती तणावात असल्याचे सांगितले जाते.

शनिवारी दुपारी ती खोलीवर परतली. थोड्या वेळाने तिच्या लहान भावाने तिला आवाज दिला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने संशय आला. मागील खिडकीतून पाहिले असता, प्रांजली पंख्याला स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. क्षणभरात परिसरात खळबळ उडाली. शेजाऱ्यांनी धाव घेत दरवाजा तोडला व तिला बाहेर काढून तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

या घटनेने गाव व परिसरात शोककळा पसरली आहे. वडील दिलीप चंद्रमान ननकटे (वय ५०) यांच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार रमेश खरकाटे करीत आहेत.

कोवळ्या वयात आयुष्याची उमेद संपवणाऱ्या प्रांजलीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. घरगुती वादाच्या जखमा किती खोलवर परिणाम करू शकतात, याचे हे एक वेदनादायी उदाहरण ठरले आहे. समाजमनाला विचार करायला लावणारी ही घटना आहे.