दिल्ली : एअर मार्शल विजयकुमार गर्ग, एव्हीएसएम, व्हीएसएम, एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, मेंटेनन्स कमांड, भारतीय वायुसेना यांनी एअर फोर्स स्टेशन प्रहलादपूर येथे भेट दिली. त्यांच्यासोबत एअर फोर्स फॅमिलीज वेल्फेअर असोसिएशन (प्रादेशिक) अध्यक्षा सौ. ऋतु गर्गही उपस्थित होत्या.
त्यांचे स्वागत स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन लोकेशकुमार मिश्रा, व्हीएसएम आणि स्थानिक एएफएफडब्ल्यूए अध्यक्षा सौ. ऋचा मिश्रा यांनी केले.

या भेटीदरम्यान एअर मार्शल गर्ग यांना डेपोतून होणाऱ्या एव्हिऑनिक्स व ग्राउंड सपोर्ट उपकरणांच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थापनाबाबत तसेच सुरू असलेल्या इंडक्शन, ओव्हरहॉल्स व स्टॉकहोल्डिंग ऑपरेशन्सची माहिती देण्यात आली.

आधुनिकीकरण व कार्यक्षमतेचे महत्त्व अधोरेखित करताना एअर मार्शल गर्ग यांनी डेपोमधील प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्याची व अंमलबजावणी करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच डेपोतील अधिकाऱ्यांच्या समर्पण, व्यावसायिक कौशल्य आणि राष्ट्रीय कार्यातील उल्लेखनीय योगदानाचे त्यांनी कौतुक केले. विशेषतः प्रजासत्ताक दिन परेडमधील ताफ्यांच्या सादरीकरणाच्या तयारीत डेपो कर्मचाऱ्यांनी बजावलेली भूमिका त्यांनी मोठ्या अभिमानाने अधोरेखित केली.

दरम्यान, सौ. ऋतु गर्ग यांनी डेपोतील एअर फोर्स स्कूलला भेट देऊन वायुदल अधिकाऱ्यांच्या अर्धांगिनी (संगिनीं) शी संवाद साधला. एएफएफडब्ल्यूए हे वायुदलातील कुटुंबीयांच्या कल्याणासाठी कार्यरत असून, विविध उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी अर्धांगिनींनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.