नागपूर : ईद आणि गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत उत्सवाशी संबंधित भक्तीगीतेच वाजवावीत. असंबंधित गाणी, आरोग्यास अपायकारक डीजे आणि लेझर लाईटसारखे प्रकार टाळा. पैशांचा अपव्यय न करता तो समाजोपयोगी कार्यासाठी वापरल्यास नागपूर शहर एक वेगळी सामाजिक ओळख निर्माण करू शकेल,असे थेट आणि ठाम आवाहन शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.
शहरात ५ सप्टेंबरला ईद तर ६ सप्टेंबरला गणेश विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर दि. ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी शिक्षक सहकारी बँक, गणेशपेठ येथे शांतता समितीची बैठक झाली. बैठकीला शहरातील सुमारे दोनशे सदस्य, मान्यवर, माजी आमदार आणि सर्व पोलीस ठाण्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आयुक्तांनी स्पष्ट केले की, शहरातील सामाजिक बांधिलकी व जातीय सलोखा जपणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. ‘ विश्वास नसेल तर सणाचा आनंद हरवतो. पोलीस दल कर्तव्य बजावत असताना त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. यामुळे नागपूर पोलिसांचा आत्मविश्वास वाढेल,’ असे ते म्हणाले. मंदिरासमोरून मिरवणूक गेली तर मुस्लिम बांधवांना आणि मशिदीसमोरून मिरवणूक गेली तर हिंदू बांधवांना सुरक्षित वाटले पाहिजे. एकमेकांचे स्वागत करणे आणि आनंदात सहभागी होणे ही खरी एकोपााची खूण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
धार्मिक उत्सवांत अनेकदा अनावश्यक खर्च होतो. डीजे, लेझर लाईट, फुजूल सजावट यासाठी पैसा खर्च करण्याऐवजी तो गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी वापरल्यास त्यातून खरी समाजसेवा घडेल, असा संदेशही त्यांनी दिला. तसेच मिरवणुकीच्या वेळा, मार्ग आणि सहभाग याबाबत काटेकोर स्पष्टता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. असंबंधित गाणी लावल्यास वातावरण बिघडते, त्यामुळे असे प्रकार सर्वांनीच टाळावेत, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
या बैठकीला संयुक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, डॉ. शिवाजी राठोड, राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, राहुल मदने, लोहित मतानी, निकेतन कदम, रश्मिता राव, ऋषिकेश सिंगारेड्डी, नित्यानंद झा यांच्यासह सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त उपस्थित होते. माजी आमदार विकास कुंभारे, अनिस अहमद तसेच इतर मान्यवरांचाही सहभाग होता. बैठकीचे सूत्रसंचालन एसीपी अनिता मोरे यांनी केले तर आभार एसीपी श्वेता खाडे यांनी मानले.
सर्वांनी मिळून ईद व गणेशोत्सव शांततेत, सौहार्दाने व जबाबदारीने साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करत बैठक उत्साहात संपन्न झाली.
