Home - World

अमेरिकेत का होतो गोळीबार ?

October 3, 2017 By lakshavedhTags

share this article

World

अमेरिकेत का होतो गोळीबार ?

एखाद्या नाईट क्लबमध्ये गोळीबार, लाईव्ह म्युझिक काॅन्सर्टमध्ये गोळीबार, वर्दळीच्या मार्गावर गोळीबार, चैकशीअंती आरोपी सापडतो, अनेकदा एखादी दहशतवादी संघटना या घटनेची जबाबदारी घेते, कॅन्डलमार्च निघतो, गोळीबारामध्ये गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते, मग त्या घटनेला वर्षानुवर्षे आठवित नागरिक घटनास्थळी जाऊन श्रद्धांजली वाहतात. गेल्या 20 वर्षात अमेरिकेत हेच सुरू आहे. काल लास वेगास सारख्या शहरात लाईव्ह म्युझिक काॅन्सर्टमध्ये झालेला गोळीबार सुद्धा असाच होता. नंतर या गुन्ह्याची जबाबदारी आयसीसने घेतली. मात्र, यात किती सत्यता आहे. हे पडताळणे देखील तितकेच कठीण. तिसऱ्या जगातील नागरिकाना देखील इतकेच माहिती असते, हे म्हणण्यापेक्षा त्यांना तितकीच माहिती पुरविण्यात येते. इंटरनेट क्रांतीच्या काळात सुद्धा एखादी गोष्ट लपवून ठेवण्याची कला या विकसिक देशांकडे आहे. त्यामुळे लास वेगासचे खरे कारण देखील कधीच पुढे येणार नाही. मात्र, गत काही काळपासून अमेरिकेत सुरू असलेल्या गोळीबारांची चिकित्सा करणे तितकेच गरजेचे असून आपल्या देशात अशी परिस्थिती उद्भवू नये, हा या मागच हेतू.
विकसित देश, सर्वात मोठी आर्थिक महासत्ता, सैन्य शक्तीतही उजवे, सर्वात प्रभावी गुप्तचर यंत्रणा, तरीही अमेरिकेत गोळीबारासारख्या घटना सातत्याने घडत आहे. तेथील प्रशासन मग त्यांचा प्रमुख कोणीही असो इतके गाफील राहतात, की त्यांना एखादी व्यक्ती दहा बंदुका, त्याही साद्या सुद्या नाही, तर आॅटोमॅटिक वेपनने अंधाधुंद गोळीबार करतो. यात 58 नागरिकांचा मृत्यू होतो. 500 पेक्षा अधिक जण जखमी होतात. अमेरिकेसारख्या देशात हे इतके सहजासहजी कसे काय घडू शकते. हा प्रश्न या निमित्तान उपस्थित होतो. यासाठी गत काळात जितक्याही गोळीबाराच्या घटना घडल्या त्यावर दुष्टिक्षेप टाकणे महत्वाचे ठरते.

अमेरिकेतील ‘गनशॉप’

आॅक्टोबर 1991 रोजी टेक्सासच्या किलीन भागात एका माथेफिरूने वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांवर ट्रक चालविला व गोळीबार केला. यात 23 जणांचा मृत्यू झाला.
20 एप्रिल 1999 मध्ये अमेरिकेतील कोलोरॅडो येथील कोलंबाईल हायस्कूलमध्ये दोन विद्यार्थ्यांनी अधांधुद गोळीबार केला होता. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. नंतर त्या विद्यार्थ्यांनी स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केली. 16 एप्रिल 2007 साली व्हर्जिनियातील टेक युनिव्हर्सिटीमध्ये हल्लेखोरांनी 30 लोकांचा बळी घेतला. 3 एप्रिल 2009 मध्ये न्युयाॅर्कच्या बिघमटनच्या सिव्हीक इमिग्रेशन सेंटवर हल्ला झाला. यात 13 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. 14 डिसेंबर 2012 साली कनेक्टिकट येथे एका शाळेत अॅडम लान्झा नामक 20 वर्षीय हल्लेखोराने गोळीबार केला. या हल्लात 20 विद्यार्थ्यांसह 26 जणांचा बळी गेला. हल्लेखोराने आपल्या आईची देखील हत्या केली. 2 डिसेंबर 2015 रोजी कॅलिफोनिर्यातील इनलॅंड रिजनवर बाॅम्ब हल्ला करण्यात आला होता. यात 14 लोकांना हकनाक बळी गेला. 12 जून 2016 रोजी आॅरलॅंडो येथील समलैंगिक नाईट क्लबमध्ये अशाचप्रकारे गोळीबार करण्यात आला. यात 50 जणांना आपला जीव गमवावा लागला. काल 2 आॅक्टोबर 2017 ला लास वेगास येथे गोळीबार करण्यात आला. एकंदरीत या सर्व घटनांमध्ये बरेच साम्य आहेत. विशेष म्हणजे सर्व गुन्ह्यात अत्याधुनिक बंदुकांचा वापर हा मुख्य चिंतनाचा विषय आहे. अमेरिका शस्त्रास्त्र उत्पादन व विक्रीमध्ये अग्रस्थानावर आहे. या देशातील प्रमुख उद्योगांमध्ये शस्त्रास्त्र निर्मितीचा क्रमांक लागतो. त्यामुळे या उद्योगाशी निगडीत उद्योजकांना येथील राजकारणावर चांगलाच वचक आहे. हाच वचक गोळीबारासारख्या प्रकरणांना दडपण्यात कामी येतो. यातूनच अशा गुन्ह्यांची जबाबदारी दहशतवादी संघटनांवर टाकून बंदूक निर्मिती व विक्रीवर परिणाम होऊ नये हा हेतू साधल्या जातो, असा एक मतप्रवाह अमेरिकेत आहे. आणि तो दिवसेंदिस खरे ठरत असल्याचेही दिसून येते. अमेरिकेतील आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते की, येथील प्रत्येक 100 नागरिकांमागे 88 जणांकडे अत्याधुनिक बंदुका आहेत. येथे बंदुक बाळगने किंवा विकत घेणे प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळेच बंदुका घेण्यासाठी जणू स्पर्धाच लागलेली असते. यासाठी अमेरिकेत यासाठी कायदा सुद्धा आहे. त्यामुळे बंदूक घेणाऱ्याला सर्व पडताळणी करणे आवश्यक असते. परंतु कायद्याची जी अवस्था आपल्या देशात आहे. तशीच अमेरिकेत देखील आहे. या कायद्यात इतक्या त्रुटी आहेत की, ज्यामुळे कोणालाही बंदुक विकत घेताना फारशी अडचण होत नाही. कायद्यानुसार बंदुक घेणारा मानसिक दृष्ट्या योग्य असला पाहिजे, तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा, त्याने 18 वर्ष पूर्ण केलेले असावे. हे सर्व पडताळण्याचे काम एफबीआयला देण्यात येते. त्यानुसार बंदुक विकत घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर 3 दिवसाच्या आत ही पडताळणी होणे आवश्यक आहे. या कालावधीत पडताळणी पूर्ण न झाल्यास संबंधिक व्यक्तीला बंदूक देण्याची तरतूद आहे. त्यामुळे हा कायदा कश्याप्रकारे उद्योजकांच्या हिताचा आहे. हे लक्षात येते. इतकेच नव्हे तर बंदूक विक्रीचा व्यवसाय आॅनलाईनही आहे. त्यामुळे पडताळणी करणे अधिकच किचकट होऊन बसते. गरज नसतानाही केवळ उद्योजकांचे हित साधण्यासाठी आपल्या देशातील नागरिकांना इतक्या सहजासहजी बंदूक उपलब्ध करणे अमेरिकेला चांगलेच महागात पडत असल्याचे एकंदरित परिस्थितून दिसून येते. यामागचे अर्थकारण खूप मोठे असल्याने या प्रकरणांची उकल होत नाही. दिवसेंदिवस लोप पावत चाललेली संवेदनशिलता आणि सहनशिलता यामुळे एखादी माथेफिरू आपल्या बंदुकीतून कुठेही गोळीबार करतो आणि सामान्यांचा बळी घेतो. काही घटनांमध्ये दहशतवाद्यांचा हात असेलही मात्र घटनांच्या मुळापर्यंत जाण्याऐवजी प्रशासन नवनवे दावे करून नागरिकांना गोंधळवून टाकतात, त्यामुळे खरे कारण कधीच पुढे येत नाही. आपल्या देशातील नगारिकांचा बळी घेऊन आर्थिक महासत्ता म्हणून मिरविणाऱ्या अमेरिकेतील सुज्ञ नागरिकांना ही बाब चांगल्याप्रकारे ठावूक आहे. पण देशातील धोरणांपुढे ते सुद्धा तिकेच हतबल झाल्याने गोळीबारामध्ये आप्तांना गमविण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीही नाही.

-(sspakalwar@gmail.com)

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft