Home - World

जागतिक अशांतीचे गुढं शस्त्रास्त्र उद्योगात

September 30, 2017 By lakshavedhTags

share this article

World

जागतिक अशांतीचे गुढं शस्त्रास्त्र उद्योगात

दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात युद्धाविषयीच्या संकल्पनेला नवे वळण मिळाले. युद्धाची खुमखुमी असलेल्या देशांनी व नेत्यांनी या महायुद्धातून चांगलाच धडा घेतला, म्हणूनच संयुक्त राष्ट्राची निर्मिती झाली. आज जगातील बहुतांश देश संयुक्त राष्ट्रात सदस्य आहेत. शेजारील किंवा इतर देशांसोबत सुरू असलेले शितयुद्धातून मार्ग काढण्याचे काम संयुक्त राष्ट्र आजपर्यंत पार पडत आले आहे. म्हणूनच तिसऱ्या महायुद्धाची शक्यता अद्यापतरी दिसून येत नाही. पण दरम्यानच्या काळात सर्वच देशांना कळून चुकले की, जागतिक स्तरावर टीकून राहण्यासाठी सरंक्षण शक्ती वाढविणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून अमेरिका, रशिया, चिन, फ्रान्स सारख्या देशांनी शस्त्रास्त्र उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. आज या उद्योगात जागातील सर्वात मोठे सौदे होतात. उदाहरण घ्यायचे झाल्यास भारत, पाकिस्तानसह अनेक देश मुलभूत सुविधेपेक्षा संरक्षणावर अधिक खर्च करताना दिसून येतात. म्हणूनच या देशातील गरीबीने उच्चांक गाठला आहे. तिकडे मध्य पूर्व अशियामध्ये नेहमीच युद्धजन्य परिस्थिती असते. सिरिया, इराक, इराणमध्ये अनेकदा युद्धाचा भडका उडतो. यामागे इस्लामिक दहशतवाद जितका कारणीभूत तितकाच वाटा शस्त्रास्त्र उद्योगाचा आहे. आपली शस्त्रे विकण्याच्या नादात या बलाढ्या देशांनी अनेक देशांना देशोधडीला नेले हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तेथील परिस्थितींचा आढावा घेतल्यास आपल्याला सहज दिसून येईल. तरी सुद्धा या उद्योगाचा पसारा वाढत यामध्ये आण्विक शस्त्रांची भर पडल्याने तिसरे महायुद्ध झाल्यास जगाचा नायनाट होण्यास काही मिनीटं लागतील.

सद्या उत्तर कोरिया व अमेरिकेमध्ये सुरू असलेले शितयुद्ध जगासाठी धोक्याची घंटा आहे, हे यासाठीच. उत्तर कोरियाला चिन व रशियाची फूस असल्यानेच हुकूमशाहा किम जोंग उन थेट अमेरिकेवर हल्ला करण्यास सदैव तयार असतो. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किमपेक्षा एक पाउल पुढे जाऊन वक्तव्य करतांना दिसून येतात. इतकेच नव्हे तर उत्तर कोरिया आण्विक शस्त्राचे परीक्षण केल्याने अमेरिकेसह जपान व दक्षिण कोरियाच्या मनात धडकी भरली आहे. अणू बाॅम्बचा मारा सोसल्यानंतर कुणाच्याही वाट्याला जाणार नाही, अशी शपथ घेणारा जपान सुद्धा उत्तर कोरियापुढे हतबल असल्याने पंतप्रधान शिंजो अबे यांनी मुदतपूर्व निवडणुका घेण्याचे ठरविले आहे. तेथील संसद बरखास्त सुद्धा करण्यात आली आहे. अमेरिका सुद्धा आतून भीतीच्या सावटाखाली आहे. अमेरिकेला पहिल्यांदाच उत्तर कोरियाने इतके मोठे आव्हान दिल्याने आणि अध्यपदी बेपर्वा डोनाल्ड ट्रम्प असल्याने जगात सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सगळ्या घटनेमागे पारंपारिक वैर असले तरी शस्त्रास्त्र उद्योगाचाही तितकाच वाटा आहे. आजपर्यंत विकसनशील व अविकसीत देशांचे शोषण करणारे विकसित देश पहिल्यांदाच जमिनीवर आले आहे. जे पेरलं जेच उगवेल, ही म्हण येथे योग्य ठरताना दिसून येत आहे.

जागतिक स्तरावर शस्त्रास्त्र उद्योगामध्ये लाॅकहीड मार्टीन, बोइंग,बिएई सिस्टम्स, रेथीयाॅन आणि नाॅर्थरोप या 5 प्रमुख कंपन्या कार्यरत आहेत. यामध्ये मिसाईल, सुरक्षा प्रणाली, लडाकू विमानं, तसेच अनेक गुप्त अशा शस्त्रांचा ते व्यापार करतात. नुकतेच नाॅर्थरोप ग्रुमेन काॅर्पोरेश या कंपनीने आॅरबीटल एटीके हे क्षेपणास्त्र 7.8 अरब डाॅलरला खरेदी केले. याशिवाय लडाकू विमानांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा सौदा झाला. यात युनायटेड टेक्नाॅलाॅजीने विमान उद्योगातील सर्वात मोठी कंपनी राॅकवेल काॅलीन्सलाच 30 अरब डाॅलरमध्ये विकत घेतले. या व्यापारांमध्ये नेमका सौदा कशाचा होतो, ही बाब कळायला मार्ग नसतो. अनेकदा या संदर्भातील आकडे सुद्धा बाहेर येत नाही. यामध्ये कार्यरत कंपन्या नेमके काय बनवितात याची माहिती सुद्धा सहजासहजी उपलब्ध होत नाही. या सर्व कंपन्याचा लेखाजोखा स्टाॅकहोम इंटरनॅशनल इन्स्टीट्यूटकडे उपलब्ध असतो. या कंपन्यांचा संक्षिप्त कार्यवृत पुढील प्रमाणे आहे.


लाॅकहीड मार्टीन
अमेरिकेती प्रमुख शस्त्रास्त्र उत्पादन करणारी कंपनी म्हणून लाॅकहीड मार्टीनची ओळख आहे. ही कंपनी लडाकू विमानं, क्षेपणास्त्र तंत्रज्ञान, हेलिकाॅप्टर, अंतराळ तंत्रज्ञानाचे उत्पादन व विक्री करते. क्षेपणास्त्र संरक्षण तंत्रज्ञान हे या कंपनीचे सर्वात महत्वाचे उत्पादन होय.
बोईंग
ही सुद्धा अमेरिकन कंपनी आहे. मानवरहित विमान, स्पेस तंत्रज्ञान, सॅटलाईट सिस्टम, क्षेपणास्त्र संरक्षणासह गुप्त संरक्षण करणारे शस्त्र व तंत्रज्ञान विकसित करण्याचे मुख्य कार्य ही कंपनी करते. आजघडीला या कंपनीची किंमत 30 अरब डाॅलर इतकी आहे. जगभरात या कंपनीचे 50 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. स्पेस लाॅंच सिस्टम पहिल्यांदा याच कंपनीने तयार केले होते.
बिएई सिस्टम
ब्रिटनमधील प्रमुख शस्त्रास्त्र उत्पादन करणारी कंपनी म्हणून बिएईची ख्याती आहे. प्रामुख्याने व्यावसायिक व लडाकू विमानं तयार करण्यात या कंपनीचा खाक्या आहे. यासोबत पाणबुडी, टॅंकसह प्रगत शस्त्रांच्या निर्मितीतही ही कंपनी अग्रेसर आहे. अमेरिकेत सुद्धा या कंपनीच्या शाखा आहे.
रेथियाॅन
अमेरिकन कंपनी असलेल्या रेथियाॅन प्रामुख्याने गुप्त संरक्षण तंत्रज्ञान उत्पादन करण्यात अग्रेसर आहे. आजपर्यंत या कंपनीने 24 अरब डाॅलरच्या साहित्यांची विक्री केली आहे. अमेरिकी सैन्याला शस्त्रास्त्र पुरविणारी सर्वात मोठी कंपनी म्हणून देखील या कंपनीची ओळख आहे. रेथियाॅन गाईडेड मिसाईल बनविणारी ही जगातील पहिली कंपनी होय. तसेच रडार तंत्रज्ञान, कम्युनिकेशन सिस्टम, टारगेट तंत्रज्ञानामध्ये देखील ही कंपनी अग्रेसर आहे.
नाॅर्थरोप ग्रुमेन
एरोस्पेस व इतर शस्त्रास्त्र बनविणाऱ्या या कंपनीचा व्यवहार 1593 अरब डाॅलर इतच प्रचंड आहे. एरोस्पेस सिस्टम, अंतराळ तंत्रज्ञान, सायबर स्पेस आणि अंडवाटर तंत्रज्ञान अशा विभागात या कंपनीचे कार्य सुरू असते. जगभारातील जवळपास सर्वच देशाला ही कंपनी सैन्य साहित्य पुरविते.

 

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft