Home - AsiaIndia-भारत

सुरजागड लोहप्रकल्पाचा वाद चिघळणार !

April 9, 2019 By lakshavedhTags

share this article

Asia

India-भारत

सुरजागड लोहप्रकल्पाचा वाद चिघळणार !

एकही औद्योगिक प्रकल्प नसलेला व नक्षलवादाने ग्रासलेला एकमेव गडचिरोली जिल्ह्याला सुरजागड लोहप्रकल्पाकडून अनेक अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. परंतु राजकीय दुर्लक्षामुळे तो प्रकल्प सुद्धा जिल्हावासीयांच्या हातून जवळपास निसटल्यात जमा आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विशेषकरून अहेरी विधानसभा क्षेत्र ज्या ठिकाणी सुरजागड पहाडीवर मोठ्या प्रमाणात लोहखनीज आहेत. त्या परिसरातील आदिवासी नागरिकांना शेकडो वर्षानंतर मुख्यप्रवाहात आणण्याची संधी शासनाने गमावली आहे. लोहप्रकल्प आपल्याच क्षेत्रात व्हावा अशी मागणी येथील नागरिकांनी वेळोवेळी केली. परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून तो प्रकल्प सुरजागडपासून जवळपास 80 किमी दूरवर उभारण्याचे ठरविण्यात आले.

गावात शुकशुकाट पसरला आहे

दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाचे भूमिपूजन केले. परंतु प्रकल्प उभारणीचे काम थंड बस्त्यात आहे. परिणामी सर्व उत्खनन केलेले लोहखनीज चंद्रपूर जवळील घुग्गुस येथे लाॅयड मेटल्स कंपनीत जमा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रकल्पात आम्हाला कुठलेच स्थान नाही अशी भावना स्थानिक आदिवासींच्या मनात निर्माण झाली आहे. परिणामी वेळोवेळी उत्खनन थांबविण्यासाठी आंदोलन होत असतात. काही महिन्यांपूर्वी लोहखानीज वाहून नेणार्या ट्रकने एटापल्ली मार्गावर एसटी बसला धडक दिल्याने 4 नागरिकांचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त नागरिकांनी मार्गावरील 15 ट्रक पेटवून दिले. यात अपघाताचा संताप तर होताच त्याहीपेक्षा प्रकल्प हातून गेल्याचा असंतोष देखील होता. तो यामार्गाने बाहेर पडला. अपघानंतर परिसरातील वातावरण बरेच तापले होेते. यातून मार्ग काढण्यासाठी पालकमत्री अंम्ब्रीश आत्राम व लाॅयड मेटल्सच्या अधिकार्यांनी तत्काळ आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले खरे पण दोन महिने उलटूनही अपघातग्रस्तांना मदत मिळाली नाही. परिणामी स्थानिकांमधे प्रशासनाविषयी प्रचंड रोष आहे. अशात लोकसभा निवडणूक आल्याने सत्ताधारी उमेदवाराला फटका बसू शकतो. स्थानिकांना या संदर्भात विचारणा केल्या ते यंदा आम्ही नोटा ला मत देणार असे सांगितले. एटापल्ली तालुक्यातील अनेक गावात मतदानाच्या दोन दिवसांपर्यंत राजकीय पुढारी किंवा त्यांचे कार्यकर्ते पोहोचलेले नाही. दुसरीकडे माओवाद्यांनी सुद्धा निवडणुकीवर बहिष्कार टाण्याचे आवाहन केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गडचिरोलीत प्रचार सभा घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांसह अनेक राजकीय पुढार्यांनी राष्ट्रीय मुद्दे मांडले परंतु नक्षलवाद असेल किंवा सुरजागडचा प्रश्न असेल याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यामुळे जनतेचा पूर्ण हिरमोड झाला आहे. रोजगाराचा प्रश्न संपूर्ण देशात पेटलेला असताना नक्षलग्रस्त भागात गत पाच वर्षात कुठलेच रोजगार निर्माण न करणे हे शासनाचे सर्वात मोठे अपयश होय. रोजगार व शिक्षणाअभावी आदिवासी तरूण नक्षलवादी चळवळीकडे ओढला जातोय. नक्षाल्यांनी सुद्धा गडचिरोलीच्या बाबतीत जी शासनाची उदासीन भूमिका आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. अशा परिस्थिीतीत सुरजागड प्रकल्प जिल्हावासीयांसाठी विशेषकरून दुर्गम भागातील आदिवासींकरिता मुख्य प्रवाहात येण्याचा नवा मार्ग होता. पंरतु तो मार्ग सुद्धा बंद झाला आहे. उद्योग उभारणार…रोजगार निर्माण करणार.. या सारखे वाक्य केवळ निवडणुकांपुरते असतात हे आता जनतेला चांगलेच ठावूक आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ‘नोटा’ला अधिक मतदान गेल्यास आश्चर्य वाटायला नको.

सुरजागड प्रकल्प उभारणी शक्य आहे

नक्षलवादाचे व पर्यावरणाचे दाखले देउन सुरजागड प्रकल्प एटापल्ली परिसरात उभारणे शक्य नाही असे दाखले प्रशासन व राजकीय पुढारी देताना दिसतात. परंतु गत दोन वर्षातील परिस्थिती बघीतल्यास उत्खनानासाठी जी शक्ती शासनाने लावली तेवढीच शक्ती लोहप्रकल्पाला लावल्यास तो एटापल्ली परिसरात उभारणे शक्य होईल. सद्यास्थितीत उत्खनन परिसरात पोलिस व सिआरपीएफची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे. उत्खनन केलेला कच्चा माल नेण्यासाठी जंगलातून मार्ग तयार करण्यातला आला आहे. यासाठी अनेक झाडांची बेकायदा कत्तल करण्यात आल्याचेही दिसून येते. नक्षलवाद्यांनी ट्रकांची जाळपोळ केली होती. परंतु पोलिस बंदोबस्तामुळे ते सुद्धा शांतच आहे. अशा परिस्थितीत लोहप्रकल्पाच येथे का उभारण्यात नाही आला हा प्रश्न स्थानिक विचारतात. परंतु या प्रश्नाचे उत्तर शासनाकडे नाही. परिसरातील अनेकांनी याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे आवाज दाबण्यासाठी अनेक प्रयत्न होत असल्याचे ते सांगातात. निवडणुकांमुळे या ठिकाणी आंदोलनाला ब्रेक देण्यात आले आहे. परंतु, निवडणुका संपताच हा मुद्दा पुन्हा पेटणार हे मात्र निश्चित..!

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft