Home - India-भारत

दादाजी खोब्रागडे नावाची दंतकथा….

June 5, 2018 By lakshavedhTags

share this article

India-भारत

दादाजी खोब्रागडे नावाची दंतकथा….

साधारण पाच वर्षांपूर्वी कामानिमित्त नागभीडला जाणे झालेे. परत येताना बसस्टॅंडवर अगदी माझ्या बाजुला एक गृहस्थ उभे होते. अर्धा तास मी बसची वाट बघत उभा होतो, परंतु बसने बराच उशिर केला. दरम्यान माझ्या बाजुला असलेले गृहस्थ सुद्धा काहीतरी पुटपुटत होते. मला निट काही समजले नाही. बहुदा ते सुद्धा बसची वाट बघून वैतागले असावे. तेवढ्यात त्यांच्या दिशेने एक व्यक्ती हातवारे करीत ‘ऐ एचएमटी’ अशी हाक मारली. त्या गृहस्थांनी सुद्धा त्याला हात दाखवून प्रतिसाद दिला. त्यांच्या संभाषणावरून ते एकाच गावातील असल्याचे समजले. पुढे त्यांचे बोलणे चालूच होते. बसला उशिर असल्याने मी सुद्धा बाजुला उभा राहून त्या दोघांच्या गप्प ऐकत बसलो. दरम्यान त्यांच्या एकंदरीत संभाषणावरून माझ्या बाजुला उभी असलेली व्यक्ती प्रसिद्ध एचएमटी तांदळाचे जनक असल्याचे लक्षात आले. त्या दोघातील चर्चेला ब्रेक लागल्यानंतर मी लगेचच दादाजींना विचारलं ‘ तुम्ही एचएमटी तांदळाचा शोध लावला का, ते उत्तरले होय, मीच एचएमटी वाण विकसीत केले.

पुरस्कार स्वीकारतांना दादाजी

मला त्यांच्या या उत्तराने फार कुतुहल निर्माण झाले होते. मी पुढे काही प्रश्न विचारणारच तेवढ्यात माझी बस आली. आणि दादाजींसोबतचे अर्धवट संभाषण संपवून मी घराकडे निघालो. पण बसमध्ये बसल्यावर माझ्या मना अनेक प्रश्न निर्माण झाले होते. घरी आल्यावर लगेच इंटरनेटवर दादाजी व एचएमटी बद्दल शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या कार्याची दखल फोर्ब्स या आंतरराष्ट्रीय मासिकाने घेतली असल्याचे समजले. नागभीड तालुक्यातील नांदेड सारख्या लहान गावातील व्यक्तीचे नाव फोर्ब्समध्ये येणे साधरण बाब नव्हती. मात्र, त्याचे महत्व कुणालाही कळले नाही. दादाजींनी धानातील वेगवेगळ्या 9 वाणाचे शोध लावले. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना 107 पुरस्कार देखील प्राप्त झाले. यात कृषीभूषण पुरस्काराचाही समावेश आहे. फोर्ब्सनेही दखल घ्यावी असे संशोधन, इतके पुरस्कार मिळून सुद्धा दादाजीं सरकारदरबारी नेहमीच उपेक्षितच होते. अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा माध्यमांमध्ये बातमी आल्यावर त्यांना उपचारासाठी मदत करण्यात आली. तोपर्यंत कृषीप्रधान देशातला कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी दुर्लक्षित होता ही शोकांतिकाच आहे.

आज आपल्यात दादाजी नाही. पण त्यांनी संशोधन केलेले वाण आपल्यात आहे. ते गेल्यावर अनेकांनी त्यांच्याबद्दल सहनुभूती व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. माध्यमांमध्ये तशा बातम्या देखील छापून येत आहेत. राजकीय नेत्यांना कोणत्या गोष्टींचे भांडवल कसे करावे हे सांगायची गरज नसली तरी दादाजी सारख्या व्यक्तीची जपणूक कशी करावी हे सांगण्याची गरज मात्र निश्चीतच आहे. एका माध्यम समुहाच्या मालकाने आपण दादाजींना मदत करू न शकल्याची खंत व्यक्त केली आहे. व त्यांचे कर्मचारी सोशल मिडियावरून त्यांची ती पोस्ट फिरवीत आहेत. हा हास्यास्पद प्रकार बघून खरच खूप दुखः वाटले. मोठमोठाले कार्यक्रम घेवून प्रसिद्ध व्यक्तींसोबत फोटो काढून आपल्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर प्रकाशित करणारी ही व्यक्ती, निदान प्रसिद्धीसाठी तरी फोर्ब्सने दखल घेतलेल्या व्यक्तीसोबत फोटो काढू शकली नाही. ही खंत मला आहे. शेवटी काय, दादाजींनी आपले काम केले व या जागातून निघूनही गेले. हयातीत दुर्लक्ष करणारे आता खंतही व्यक्त करतील. कदाचित उद्या त्यांच्या नावे एखादे पुरस्कार देण्यात आल्यास आश्चर्य वाटू नये. त्यांनी शोधलेला वाण अनेकांची भूक शमविण्यास सक्षम आहे. परंतु एखाद्या कृषी संशोधकाकडे केलेल्या दुर्लक्षितपणामुळे येणाऱ्या पीढीसाठी दादाजी खोब्रागडे केवळ एक दंतकथाच ठरायला नको…

share this article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

footlogo

lakshavedh.com

आज बहुतांश वाचकवर्ग माहिती मिळविण्‍यासाठी इंटरनेटचा वापर करताना दिसून येतात, मात्र यामध्‍ये इंग्रजी आणि हिंदी साहित्‍यांचा मोठा भरणा आहे. यामुळे मराठी वाचकांचा अनेकदा हिरमोड होतो. हिच बाब हेरून आम्‍ही ‘लक्षवेध डॉट कॉम’ (lakshavedh.com) या मराठी संकेतस्‍थळाची निर्मिती केली आहे.

Copyright © 2017 Lakshavedh. All rights reserved.

Powered by Asesa Soft